‘हीरक महोत्सवी’ अभियानात स्वच्छता, सौंदर्यीकरणावर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 03:44 PM2020-03-05T15:44:49+5:302020-03-05T15:44:56+5:30
मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे.
अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगर विकास विभागाने १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात ‘हीरक महोत्सवी अभियान’राबविण्याचे निर्देश जारी केले. या अभियान अंतर्गत शहरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भर देण्यात आल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत स्वच्छतेच्या कामासाठी मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे. यासाठी प्रशासनाचे नियोजन व कर्मचाºयांच्या इच्छाशक्तीची गरज असून, यानिमित्ताने प्रशासनाची कार्यक्षमता दिसून येणार आहे.
१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात ‘हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानात घनकचºयासोबतच बांधकाम आणि पाडकाम कचºयाचीही विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. ३० एप्रिलपर्यंत राबविल्या जाणाºया अभियानात रस्त्यांच्या दुरुस्तीचाही समावेश करण्यात आला आहे. स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला असून, सदर कामासाठी मनपा प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचाºयांचे संख्याबळ उपलब्ध आहे. त्या पृष्ठभूमिवर मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
स्वच्छता विभागाची परीक्षा
मनपाच्या स्वच्छता विभागात साफसफाईसाठी आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी आहेत. यापैकी काही कर्मचारी विविध विभागांच्या बिळात दडून बसले आहेत. ११ पेक्षा जास्त पडीत प्रभागांमध्ये ६१६ पेक्षा अधिक खासगी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर देखरेखीसाठी आरोग्य निरीक्षकांची फौज आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जमा होणारा कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर साठवला जात असल्याने सफाई कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. अर्थातच, सदर अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता विभागाची परीक्षा दिसून येईल.
रस्त्यांलगत मातीचे ढीग!
संपूर्ण शहरात उघड्यावर मातीचे ढीग आहेत. ज्या ठिकाणी विकास कामे सुरू नाहीत, त्याठिकाणीसुद्धा माती, धूळ व कचरा साचल्याचे चित्र आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, रस्त्यांच्या दुभाजकालगत मातीचे ढीग आहेत. धुळीमुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक कोणते कर्तव्य निभावत आहेत,असा सवाल उपस्थित होतो.