संघर्षापेक्षा समन्वयावर भर - आमदार अमोल मिटकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:14 AM2020-06-24T10:14:48+5:302020-06-24T10:15:08+5:30
सर्वांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करून मला माझ्या पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे, अशी ग्वाही आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला विधान परिषदेवर पाठविले. आता आमदार म्हणून वावरताना जबाबदारीचे जाण अन् भान आहे. पक्षहित सर्वोतोपरी याच न्यायाने काम करताना सामान्यांचा आवाज मला विधिमंडळात पोहचविण्याच्या या प्रवसात सत्तासंघर्ष माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. सर्वांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करून मला माझ्या पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे, अशी ग्वाही आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
ल्ल ‘लोकमत’ कार्यालयात त्यांनी मंगळवारी भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी भूमिका सर्वांना सोबत घेऊनच चालण्याची आहे. सर्वांशी संवाद आहे, पक्षवाढीसाठी जे महत्त्वाचे त्याला प्राधान्य हेच माझे धोरण राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझा प्रवास हा ग्रामीण भागातून विधिमंडळापर्यंत झाला आहे. तो संघर्षाचाच आहे. ग्रामीण भागातच वाढलो, शिकलो, तिथेच मोठा झालो, त्यामुळे या भागातील समस्यांची जाण आहे. त्यासाठी नव्याने अभ्यास करण्याची गरज नाही. शासन व प्रशासन यामधील दुवा म्हणून काम करण्यावर माझा भर असल्याने मी हाती घेतलेली समस्या मार्गी लागेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील अनेक प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडलेले आहेत. सुदैवाने आमच्या पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे या प्रश्नांची तड लावतानाच पर्यटनपूरक रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरनाळा, काटेपूर्णा अभयारण्य, चिखलदरा, अकोट, शेगाव व पुढे अजिंठा असा पर्यटन चतुष्कोन तयार करून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक योजना संकल्पित आहेत. मिळालेली संधी ही लोकांसाठीच आहे, याच ध्यासातून आमदार झाल्यापासून एकही दिवस विश्रांती न घेता फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार छावणीचा केलेला प्रयोग हा आॅन द स्पॉट निकाल देणारा ठरला आहे. या प्रयोगाची माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यांनी कौतुक केले, हे फार मोठे बळ आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात का, याबाबतही सतत प्रशासनाच्या संपर्कात राहून समन्वय करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकरी नेते कृष्णा अंधारे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड अलोककुमार शर्मा व निवासी संपादक रवी टाले यांनी मिटकरी यांना ‘फ्रीडम आॅफ प्रेस’ ही प्रतिमा देऊन सत्कार केला.