कोरोनातून बरे झाल्यानंतरही व्यायाम अन् पोषण आहारावर द्या भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:07 AM2020-10-18T10:07:21+5:302020-10-18T10:07:32+5:30
Recovery from corona कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम आणि शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदाही महत्त्वाची ठरते.
अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांचे धावपळीचे जीवन सुरू होते. त्यामुळे व्यायाम आणि पोषण आहाराकडे दुर्लक्ष होते. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन पुन्हा कोरोनाचा धोका संभावतो, अशा परिस्थितीत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी नियमित व्यायाम व पोषण आहाराकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. कोरोना होऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही शरीराचे पोषण महत्त्वाचे असल्याचे डाॅक्टर सांगतात. त्यासाठी व्यायाम, आहार, सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. कोरोनाबाधित रुग्णाचे वय, प्रतिकारशक्ती आणि इतर दुर्धर आजार या बाबींचा विचार करूनच आहार, व्यायाम आणि औषधांचे नियोजन महत्त्वाचे ठरते. कोरोनातून बरे झाल्यानंतर श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगासने, प्राणायाम, चालण्याचा व्यायाम करण्याच्या सूचना रुग्णांना दिल्या जातात. कोविड वाॅर्डात उपचार घेतल्यानंतर दिनचर्येत बदल होतो. अनेकांचे झोपेचे वेळापत्रक बदलते. नैराश्य, निद्रानाश, भूक न लागणे असे प्रकार घडू शकतात. मात्र कोविडमुक्तीनंतर पुरेशी झोप घ्यावी. पौष्टिक आहार घ्यावा व ताणतणावमुक्त राहावे, असे तज्ज्ञ सांगतात.
यामुळे व्यायाम महत्त्वाचा
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि मानसिक ताणही कमी होतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावरही नियमित व्यायाम करावा. मात्र शरीराला अनावश्यक ताण पोहोचविणारे व्यायाम टाळावे. इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणार्या रुग्णांना आपल्या प्रकृतीनुसार डाॅक्टरांचा व्यायामाबाबत सल्ला घ्यावा.
हे देखील महत्त्वाचे
- सकाळी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा
- शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा
- इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणार्यांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावा
- शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी
- कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यात तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा
कोरोनातून बरे होऊन तीन महिन्यानंतर एखाद्याच्या शरीरातील ॲन्टिबाॅडीज नाहीशा होऊ शकतात. असा व्यक्ती बाधिताच्या संपर्कात आल्यास त्याला पुन्हा लागण होऊ शकते. अद्याप तसे उदाहरण आपल्याकडे दिसले नाही, मात्र कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम आणि शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदाही महत्त्वाची ठरते.
- डाॅ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी