मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या नेत्र सुरक्षेवर भर - डॉ. नितीन उपाध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:33 PM2020-08-29T19:33:24+5:302020-08-29T19:34:45+5:30
मोफत उपचार करण्यासाठी विदर्भ नेत्र परिषद भर देत असल्याची माहिती विदर्भ नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन उपाध्ये यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगीतले.
- सचिन राऊत
अकोला : मेळघाटातील विद्यार्थी तसेच विदर्भातील नेत्र सुरक्षे संदर्भात जागृत नसलेल्या भागात विदर्भ नेत्र परिषदेचे कामकाज सुरु आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल दोन हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर या कामाकाजात खंड पडला असला तरी या भागातील विद्यार्थी व वृध्दांच्या नेत्र आजारांची तपासणी करुन त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी विदर्भ नेत्र परिषद भर देत असल्याची माहिती विदर्भ नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन उपाध्ये यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगीतले.
प्रश्न - विदर्भ नेत्र परिषदेचे मुख्य कार्य काय?
उत्तर - विदर्भ नेत्र परिषदेमध्ये विदर्भातील ११ जिल्हयातील नेत्र तज्ज्ञांचा सहभाग आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी एक समिती गठीत करण्यात आली असून ही समिती प्रत्येक महिन्यातील नवीन संशोधन, नेत्र क्षेत्रातील नवीन शिक्षण याचा अभ्यास करून मार्गदर्शन करते. यासोबतच दरवर्षी एक कार्यशाळा आयोजीत करून डोळयांचे विविध आजार, त्यावर उपाय योजना आणि सामाजिक संस्थांसाबेतच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचे मुख्य कार्य आहे.
प्रश्न - विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीची संकल्पना कशी सुचली?
उत्तर - मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये नेत्र दोष असतांनाही त्यांच्यात जागृती नसल्याने तसेच त्यांचे शिक्षण नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना डोळयांच्या आजाराचा मोठा सामना करावा लागत असल्याचे डॉ. शिरीष थोरात यांना कळले. यावरुन त्यांनाच ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांच्यासोबत मेळघाटातील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणीसाठी मेळघाटातील आदीवासी आश्रम शाळांमध्ये शिबीर आयोजीत केली. यासाठी परतवाडा येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. दिपाली वाटाने, मेडीकल कॉलेजचे डॉ. भावेश गरुदासानी व नेत्रतज्ज्ञांचे खासगी साहायक यांचे सहकार्य असते.
प्रश्न - नेत्र तपासणीत कोरोनाचा अडथळा आहे का?
उत्तर - मेळघाटात दोन महिन्यात अडीच हजारांपेक्षा अधिक मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनामुळे हा प्रकल्प थांबला. कोरोनामुळे प्रवास थांबल्याने मेळघाटातील विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणीला अडथळा निर्माण झाला. परंतू अध्यक्षपद असो कींवा नसो त्यानंतरही हा मेळघाटातील विद्यार्थ्याची नेत्र तपासणी आणि उपचाराचा प्रकल्प आमची टीम पुर्ण करणार आहे.
प्रश्न - विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते आजार?
उत्तर - मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये तीरळेपणा, जन्मजात मोतीबींदु, चष्मा लावणे गरजेचे असणारे नेत्रदोष आहेत. मात्र त्यांच्यात या संदर्भात जागृती नसल्याने ते उपचार घेत नाहीत. हाच प्रकार शहरात कींवा आपल्या जिल्हयात असेल तर जागृत असलेले मुलांचे पालक त्यांच्यावर तातडीने उपचार करतात. मात्र मेळघाट कींवा अशा भागात त्यांचे पालकच शिक्षीत नसल्याने डोळयांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हा प्रकल्प हाती घेण्यात आला.