प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:23 AM2020-07-28T10:23:59+5:302020-07-28T10:24:11+5:30

एका डोनरचा प्लाझ्मा केवळ एकाच रुग्णाच्या कामी येत असल्याने उपलब्ध डोनरची संख्या कमी पडत आहे.

Emphasis on plasma therapy; But it's hard to get a donor! | प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण!

प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत चौघांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीवर रुग्णालय प्रशासनाचा भर आहे; मात्र एका डोनरचा प्लाझ्मा केवळ एकाच रुग्णाच्या कामी येत असल्याने उपलब्ध डोनरची संख्या कमी पडत आहे. आरोग्य विभागासमोर ही मोठी अडचणी ठरत आहे.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण पूर्णत: बरा झाल्यानंतर प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करू शकतो. अशा एका डोनरकडून २०० मिली लीटरच्या दोन बॅग म्हणजेच ४०० मिली लीटर रक्त संकलित करणे शक्य आहे.
त्यानुसार, अकोल्यातील प्लाझ्मा थेरपी युनिटच्या माध्यमातून ११ डोनरकडून २२ बॅग प्लाझ्मा संकलित करण्यात आला. उपलब्ध प्लाझ्मा साठ्यातून ११ गंभीर रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे.
यातील चार रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी उपचार करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचादेखील प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचारावर भर देण्यात येत आहे; परंतु प्लाझ्मा संकलनाच्या किचकट प्रणालीमुळे प्लाझ्मासाठी डोनर मिळणे कठीण झाले आहे. डोनर मिळावा, यासाठी आरोग्य विभागामार्फत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डात जनजागृती मोहीम राबविली आहे; परंतु रुग्ण बरा होऊन घरी गेल्यावर पुन्हा संपर्क साधत नसल्याचेही अनुभव आरोग्य यंत्रणेला आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.


३१ डोनरची तपासणी; १० डोनर अनफिट
प्लाझ्मासाठी शासकीय रक्तपेढीमार्फत ३१ डोनरची तपासणी केल्याची माहिती आहे. त्यापैकी १० डोनर वैद्यकीयदृष्ट्या अनफिट निघाले, तर ११ जणांकडून प्लाझ्मासाठी रक्त संकलित करण्यात आले. तर उर्वरित १० डोनरला रक्तसंकलनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.


एका रुग्णाला लागतात प्लाझ्माच्या दोन बॅग!
आयसीएमराच्या नियामानुसार, एका रुग्णाला २०० मि.ली. च्या दोन बॅग असे एकूण ४०० मि.ली. प्लाझ्मा उपचारादरम्यान दिला जातो. प्लाझ्मामुळे रुग्णाच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होऊन, रुग्ण लवकर बरा होतो.


गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी चांगला पर्याय असून, त्याचे सकारात्मक परिणामदेखील दिसू लागले आहे. लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी बरे झाल्यावर प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून कोरोनावर मात करण्यास मदत होईल.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

Web Title: Emphasis on plasma therapy; But it's hard to get a donor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.