अकोल्यात वाॅशिंग पीट लाइन, अकोट ते खंडवा गेज परिवर्तनावर जोर
By Atul.jaiswal | Published: September 8, 2021 11:34 AM2021-09-08T11:34:36+5:302021-09-08T11:38:25+5:30
Akola Railway News : सिकंदराबाद येथे होणार असलेल्या बैठकीत मांडण्यासाठी तयार केलेल्या मुद्यांचे पत्र त्यांनी धाडले आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : रेल्वे गाड्यांचे डबे धुण्याची सुविधा असलेली वाॅशिंग पीट लाइन, पाणी भरण्याची व्यवस्था, दक्षिण-मध्य रेल्वेच्या फलाटांना मध्य - रेल्वेच्या फलाटांशी जोडणे, अकोट ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम मार्गी लावणे हे व इतर महत्त्वाचे मुद्दे दक्षिण- मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांसमोर रेटून धरण्यासाठी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे सज्ज झाले असून, पुढील महिन्यात सिकंदराबाद येथे होणार असलेल्या बैठकीत मांडण्यासाठी तयार केलेल्या मुद्यांचे पत्र त्यांनी धाडले आहे. मध्य रेल्वे व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला स्थानकावरून अनेक गाड्यांचे आवागमन सुरू असते. भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अकोला स्थानकावर गाड्यांची देखभाल व रेक धुण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथून कोणतीही गाडी सुरू होत नाही. दक्षिण-मध्य रेल्वेच्या पूर्णा व नांदेड स्थानकांवर वाॅशिंग पीट लाइन आहेत; परंतु या दोन्ही पीट लाइन व्यस्त असतात, त्यामुळे तेथील भार कमी व्हावा व अकोल्यातूनही नव्या गाड्या सुरू करण्यासाठी सुविधा व्हावी याकरिता अकोला रेल्वेस्थानकावर वाॅशिंग पीट लाइनची व्यवस्था करण्याची मागणी खासदारांनी या पत्रात केली आहे. याशिवाय अकोला ते खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत अकोटपर्यंतचा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झाले आहे. अकोट ते खंडवापर्यंतचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे रखडलेले काम तातडीने मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करण्याचाही मुद्दा त्यांनी पत्रात उपस्थित केला आहे. याशिवाय दक्षिण- रेल्वेच्या ४, ५ व ६ क्रमांकाच्या फलाटांवर लिफ्ट व सरकत्या जिन्यांची सुविधा निर्माण करणे, शिवणी मालधक्यावर वेअर हाऊस व इतर सुविधा निर्माण करणे तसेच नव्या गाड्या सुरू करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
दक्षिण-मध्य व मध्य रेल्वेची ट्रॅक जोडणी
अकोला रेल्वे स्थानकावर दक्षिण -मध्य रेल्वेच्या ४, ५ व ६ क्रमांकाच्या फलाटांना मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक ३ ला जोडण्यात यावे. सध्या ही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अजमेर, जयपूर, जोधपूर व बिकानेरकडे जाणाऱ्या गाड्यांना आऊटरवर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे त्या दिशेने काम मार्गी लावण्याचाही मुद्दा या पत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.