कर्मचारी पॉझिटिव्ह; तेल्हारा ‘तहसील’ सील नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:51 AM2020-08-02T10:51:01+5:302020-08-02T10:51:18+5:30
कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : आरोग्य विभागाने घेतलेल्या रॅपिड टेस्ट अंतर्गत तहसील कार्यालयातील एक कर्मचाऱ्याचा अहवाल ३१ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तहसील कार्यालयात निर्जंतुकीकरण करून कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्याचा प्रशासकीय कारभार तहसील कार्यालयातून चालतो. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३१ जुलै रोजी रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून तहसील कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने कोणतीच खबरदारी न घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत. लोकां सांगे, ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय तहसील कार्यालय प्रशासनाकडून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना मात्र नियमांचे पालन करण्यास तहसीलदार व त्यांच्या कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. स्वत: मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने, या अधिकाºयांना कुणी बोलावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही तहसील प्रशासन गंभीर दिसत नाही.
अद्याप तहसील कार्यालय सील करण्याबाबत आरोग्य विभागाकडून पत्र प्राप्त झाले नाही. पत्र प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- राजेंद्र सुरडकर, तहसीलदार, तेल्हारा
तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यासाठी अवगत केले आहे. उद्या तहसीलदार यांना पत्र देण्यात येईल आणि तहसील कार्यालय सील करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
- भरत चव्हाण, गटविकास अधिकारी, तेल्हारा