एकच मिशन जुनी पेन्शन’च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद!, संप मिटल्याचा निराेप : कर्मचारी आश्वासनाच्या पत्राच्या प्रतिक्षेत
By राजेश शेगोकार | Updated: March 20, 2023 18:00 IST2023-03-20T17:58:29+5:302023-03-20T18:00:06+5:30
Government Employees Strike: संपात सहभागी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’च्या निनादात थाळीनाद आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.

एकच मिशन जुनी पेन्शन’च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद!, संप मिटल्याचा निराेप : कर्मचारी आश्वासनाच्या पत्राच्या प्रतिक्षेत
- राजेश शेगाेकार
अकोला : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरूच होता. संपात सहभागी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’च्या निनादात थाळीनाद आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान दूपारी संप मिटल्याचे वृत्त समाेर आल्यावर कर्मचारी आनंदित झाले मात्र आश्वासनाचे नेमके स्वरूप स्पष्ट न झाल्याने राज्य संघटनेकडून पत्र मिळण्याच्या प्रतिक्षेत आंदाेनकर्तेत कर्मचारी धरणे मंडपातच बसून हाेते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्वच सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून, संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने केली जात आहेत. त्यामध्ये संपाच्या सातव्या दिवशी २० मार्च रोजी संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
डफडे व थाळी वाजवून ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशी नारेबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा थाळीनाद आणि नारेबाजीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता.