मानधनावरील कर्मचारी;मनपाकडून शासनाला माहिती सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:55+5:302021-01-08T04:55:55+5:30
अकाेला: मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत मानधन तत्वावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी शासन स्तरावर हालचाली ...
अकाेला: मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत मानधन तत्वावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेतील संबंधित अधिकारी,कर्मचाऱ्यांची माहिती मंगळवारी प्रशासनाने नगरविकास विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे.
महापालिकांमधील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, या उद्देशातून प्रशासनाने मानधन तत्वावर तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून सेवारत संबंधित कर्मचाऱ्यांना अल्प मानधनात कामकाज करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. त्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर तयार केलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी सादर केला जाताे. प्रस्तावाला मंजुरी देताना अनेक प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या वैयक्तिक राेषाला बळी पडावे लागत असल्याची परिस्थिती आहे. यामुळे प्रशासनालासुद्धा अनेकदा अडचणीचा सामना करावा लागताे. या सर्व बाबी लक्षात घेता मनपातील मानधन तत्वावर कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शासनाकडे सेवेत नियमित करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नगरविकास विभागाकड़े माहिती सादर
महापालिकेत मानधन तत्वावर सेवारत अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिलेला सेवा कालावधी आदेश व त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले किंवा नाही,याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपाने माहिती सादर केली आहे.
...तर कर्मचाऱ्यांना दिलासा
महापालिकेत मागील २२ ते २५ वर्षापासून तांत्रिक संवर्गात कनिष्ठ अभियंता, संगणक चालक पदावर कर्मचारी सेवारत आहेत. या बदल्यात त्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. राज्य शासनाने सेवेत कायम केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.