टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांचा मनपात ठिय्या

By Admin | Published: April 19, 2017 01:37 AM2017-04-19T01:37:16+5:302017-04-19T01:37:16+5:30

अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्ता कर विभागातील ७० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविल्याने, मंगळवारी त्रासलेल्या कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालय परिसरात ठिय्या दिला.

Employees of Tax Department | टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांचा मनपात ठिय्या

टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांचा मनपात ठिय्या

googlenewsNext

अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्ता कर विभागातील ७० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविल्याने, मंगळवारी त्रासलेल्या कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालय परिसरात ठिय्या दिला. ठिय्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांनी समजूत घातली. तेव्हा कुठे ठिय्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडले. मंगळवारी सायंकाळी हा ठिय्या देण्यात आला. याप्रसंगी कर अधीक्षक विजय पारतवार, उजवणे, शाहिन सुलताना आदी पदाधिकारी येथे प्रामुख्याने उपस्थित होते.
मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण न करणाऱ्या महापालिकेच्या कर वसुली विभागातील ७० कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी थांबविले. कर विभागातील कर्मचारी वगळता इतरांना दोन महिन्यांचे वेतन दिल्या गेल्याने रोष व्यक्त होत आहे. मनपा आयुक्तांना भेटूनही काही उपयोग होत नसल्याने मंगळवारी या कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला. शांततेने दिलेल्या या ठिय्या आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांची उपायुक्त सोळंके यांनी अर्धा तास समजूत घातली. अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला २०१६-१७ साठी ३५ कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या नेतृत्वात चार सहायक अधीक्षकांसह ७० कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत २५ कोटींचा महसूल गोळा केला. दहा कोटींच्या महसुलाची तूट आली म्हणून मनपा आयुक्तांनी कर विभागातील ७० कर्मचारी सोडून इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन केले. वेतन मिळाले नसल्याने आता कर्मचारी वैतागले आहेत.
आधी वसुलीबाबतचे धोरण निश्चित करा, त्यानंतर वेतन दिले जाईल, असे लहाने यांनी सांगितले. आर्थिक वर्षात महापालिकेच्या कर विभागाने २३ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यंदा महापालिके च्या कर्मचाऱ्यांना ३५ कोटींचे उद्दिष्ट दिले गेले होते. नोटाबंदी, निवडणूक आणि सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कमी पडले, त्यामुळे हे उद्दिष्ट २५ कोटींवर स्थिर झाले. एकूण ७१ टक्के कर वसुली कर्मचारी करू शकलेत.

करदात्यांची यादी, न्यायालयीन खटले आणि दैनंदिन वसुलीचे उद्दिष्ट कर विभागाने आखले पाहिजे. याबाबत दररोजचा अहवाल मनपा आयुक्त लहाने यांना या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित आहे. थकीत करदात्यांची मोठी यादी असताना कर वसुलीत प्रशासन मागे पडत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आयुक्तांनी वेतन रोखले आहे. ज्यांनी ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले, त्या कर्मचाऱ्यांचाही वेतन रोखल्या जाण्यात समावेश आहे. लवकरच याप्रकरणी तोडगा निघेल.
-समाधान सोळंके, उपायुक्त, मनपा अकोला.

Web Title: Employees of Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.