मनपा आवारात अतिक्रमण; आज सुनावणी
By admin | Published: June 29, 2015 02:06 AM2015-06-29T02:06:26+5:302015-06-29T02:06:26+5:30
मनपाची आवारभिंत तोडून परिसरात कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटल्याचे प्रकरण.
अकोला: महापालिकेच्या जागेवर दावा असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संबंधित अतिक्रमकाने २३ जून रोजी मनपाची आवारभिंत तोडून परिसरात कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटले होते. या प्रकरणी २९ जून रोजी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार असून, प्रशासनाच्यावतीने विधिज्ञ नेमकी काय बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपाच्या पश्चिम भागातील जागेवर बिपीन मिरजामले नामक व्यक्तीने कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटल्याचा प्रकार २३ जून रोजी उघडकीस आला. तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीतदेखील संबंधित अतिक्रमकाने दुकान उभारण्याचा प्रयत्न केला असता, तो डॉ.कल्याणकर यांनी हाणून पाडला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अतिक्रमकाने मनपाने उभारलेली आवारभिंत तोडून अनधिकृतपणे पुन्हा दुकान थाटले. या प्रकरणाची येत्या २९ जून रोजी न्यायालयात सुनावणी होत असून, आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त माधुरी मडावी यांची मिळमिळीत भूमिका लक्षात घेता, न्यायालयात प्रशासन काय बाजू मांडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मडावींना जबाबदारीचा विसर साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्याक डे प्रामुख्याने अतिक्रमण व मालमत्ता विभागाची जबाबदारी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तपदी असलेले दयानंद चिंचोलीकर यांची बदली झाल्यामुळे माधुरी मडावी यांना उपायुक्तपदाचा प्रभार देण्यात आला. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरुवातीला बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण जमीनदोस्त करणार्या मडावींचे शहरात फोफावलेल्या अतिक्रमणाकडे होणारे दुर्लक्ष अनेकांच्या नजरेतून सुटले नाही. मनपा आवारात तंबू ठोकणार्या अतिक्रमकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल न करता केवळ साहित्य काढून उपायुक्त मडावी गप्प का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.