राजकीय पुढाऱ्यांनी उभारलेले अतिक्रमण धाराशायी; मनपाची कारवाई
By आशीष गावंडे | Published: September 1, 2023 06:22 PM2023-09-01T18:22:46+5:302023-09-01T18:22:54+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर सुमारे बारा वर्षांपूर्वी पक्क्या स्वरुपाचे अतिक्रमीत बांधकाम करण्यात आले हाेते.
अकोला: सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यासमाेरील मुख्य नाल्यावर उभारण्यात आलेले पक्के अतिक्रमण धाराशायी करण्याची कारवाइ शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने केली. काॅंग्रेस व शिवसेनेच्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी नाल्यावर अतिक्रमीत बांधकाम केल्याची चर्चा यावेळी रंगली हाेती. ही कारवाइ पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर सुमारे बारा वर्षांपूर्वी पक्क्या स्वरुपाचे अतिक्रमीत बांधकाम करण्यात आले हाेते. परंतु तेव्हापासून यामध्ये बेघर नागरिकांचा निवारा हाेता. शहरातील स्थानिक काॅंग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक पुढाऱ्यांनी अतिक्रमीत बांधकाम केल्याची चर्चा हाेती. दरम्यान, शुक्रवारी मनपाच्या निर्मुलन पथकाने जेसीबीच्या मदतीने पक्के अतिक्रमण ताेडण्यास प्रारंभ केला. ही कारवाइ पाहण्यासाठी अकाेलेकरांनी गर्दी केली हेाती. ही कारवाइ मनपाचे नगररचनाकार आशिष वानखडे, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनिल वायदांडे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, सहा.पोलीस निरीक्षक विजय झटाले, ऐजाज शेख, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा यांसह सिटी कोतवालीच्या पाेलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.