ऊर्जामंत्री आज जिल्ह्यात
By admin | Published: May 18, 2017 12:49 AM2017-05-18T00:49:29+5:302017-05-18T00:49:29+5:30
जनतेशी साधणार थेट संवाद : महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १८ व १९ मे २०१७ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील महावितरणच्या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गुरुवार, १८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र येथे ऊर्जामंत्री कामाचा आढावा घेणार आहेत. शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ९ वाजता दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेले जिल्ह्यातील अकोली जहागीर, कान्हेरी सरप, कुरुम, माळेगाव बाजार व पिंपरीकड तसेच आयपीडीएस. योजनेंतर्गत मंजूर सुधीर कॉलनी व न्यू एमआयडीसी या सर्व ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांचा भूमिपूजन सोहळा तसेच अकोट विभागाचे लोकार्पण ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्या हस्ते अकोला येथील विद्युत भवन येथे होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ऊर्जाविषयक व इतर विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
शुक्रवारी जनता दरबार
शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाच्या ए.आर. ठाकरे सभागृह अकोला येथे जनतेशी संवाद हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऊर्जामंत्री बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून महावितरण, महापारेषण, राज्य उत्पादन शुल्क या विभागासंबंधीच्या आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदने यांचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण, महाऊर्जा या कंपनीचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी, विद्युत निरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.