सायकलद्वारे खत देण्याची लढविली शक्कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:04 AM2020-06-24T10:04:51+5:302020-06-24T10:05:11+5:30
नागेश भालतिलक यांनी शक्कल लढवून सायकलच्या स्टँडला दोरी बांधून आणि दुसºया बाजूला सरते बांधून त्यातून खत देण्याचा प्रयोग केला.
- राहुल सोनोने
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस बु.: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच काही महाग झाले आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. भाड्याच्या बैलजोडीने शेती करणे महाग झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मजुरीचे दर परवडत नाहीत. त्यामुळेच पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील एका शेतकºयाने कपाशी पिकाला सायकलला सरते बांधून खत देण्याची शक्कल लढविली. या शेतकºयाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने, परिसरातील इतरही हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.
बाभूळगाव येथील शेतकरी नागेश मधुकर भालतिलक यांनी शेतात असलेल्या कपाशी पिकाला खत देण्यासाठी शेतमजूर अधिकची मजुरी मागतात आणि बैलजोडीचेही भाडे परवडत नाही, तसेच शासनाकडून कर्जमाफी झाली; परंतु नवीन कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या वखरणी, डवरणी, निंदण, खुरपणीसोबतच खत फेकणीसाठी पैसे कुठून आणावे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. या प्रश्नातूनच नागेश भालतिलक यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. घरच्या घरी कपाशीला कसे खत देता येईल, याचा विचार केला. या विचारातूनच त्यांना सायकलद्वारे कपाशीला खत देण्याची कल्पना सुचली. सायकलने कपाशीला खत देण्याचा प्रयोग यशस्वी झाला. सायकलद्वारे पिकाला खतसुद्धा योग्य प्रमाणात दिल्या जाते. हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी बाभूळगाव येथील नागेश भालतिलक यांच्या शेतात पाहणीसाठी येत असून, हे शेतकरीसुद्धा त्यांच्या या प्रयोगाचे अनुकरण करीत आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात पिकाला खत देता येत असल्याने मजुरीचे पैसेसुद्धा वाचत असल्याचे भालतिलक यांनी सांगितले.
अशी सुचली कल्पना...
शेती करताना, मजुरीचे वाढलेले अव्वाच्यासव्वा दर शेतकºयांच्या नाकीनऊ आणत आहेत. पेरणीसोबत बैलजोडणीने पेरणी, खत सोडण्याची मजुरी शेतकºयांना परवडत नाही. बैलजोडी आणि एका धुरकºयाची दिवसाला मजुरी १२00 ते १५00 रुपये होते. एवढी मजुरी द्यायला पैसे नसल्यामुळे शेतकरी नागेश भालतिलक यांनी शक्कल लढवून सायकलच्या स्टँडला दोरी बांधून आणि दुसºया बाजूला सरते बांधून त्यातून खत देण्याचा प्रयोग त्यांनी केला.