अकोला शहरात उत्साह रामनवमीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:07 PM2019-04-13T13:07:43+5:302019-04-13T13:09:31+5:30

अकोला: उत्तर भारतातील श्रीराम जन्मभूमी ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत श्रीरामनवमीला रामजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो.

Enthusiasam of Ramnavami in Akola city | अकोला शहरात उत्साह रामनवमीचा

अकोला शहरात उत्साह रामनवमीचा

googlenewsNext

-  नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: उत्तर भारतातील श्रीराम जन्मभूमी ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत श्रीरामनवमीला रामजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो. शहरात मोठे राममंदिर, छोटे राममंदिर, बिर्ला राममंदिरात चैत्राच्या आगमनापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.  शनिवारी चैत्र शुद्ध नवमीला साजरा होत असलेल्या रामजन्म सोहळ्यासाठी रामभक्तांची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे.
चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला रामनवमी म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही करू न सोडले, तेव्हा दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र होय, असे रामायण ग्रंथात सांगितले आहे.
सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व
रामकथा परंपरेने भारताच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या रामकथांचे पठण केले जाते. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केल्या जातात. ‘काळाराम मंदिर’ सत्याग्रहामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही रामनवमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार ग़. दि. माडगुळकर यांच्या गीत रामायणामुळे रामायणातील प्रत्येक प्रसंग घराघरांत मुखोद्गत झालेला आहे. गीत रामायणातील आलंकारिक शब्दांनी मराठी मनामध्ये रामायणाचे आणि रामनवमीचे महत्त्व बिंबविले आहे. बाबूजी आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यावर्षी संस्कार भारतीने अवघ्या महाराष्ट्रात गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करीत आहेत.


शहर झाले राममय!
शहरामध्ये श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने श्रीराजराजेश्वर मंदिर ते मोठे राममंदिर, सिटी कोतवाली चौक आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगविला आहे. हैदराबादच्या कलावंतांनी तयार केलेल्या देवी-देवतांची चित्र असलेली विद्युत रोषणाई अकोलेकरांचे लक्ष वेधत आहे. महाराणा प्रताप बागजवळ अहिरावण आणि रामयुद्ध प्रसंग, जुने शहरात रेणुका माता व दत्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला आहे. रामनवमी उत्सव समितीच्यावतीने गांधी रोडवर भगव्या ध्वजांचे तोरण लावून संपूर्ण मार्ग सजविला आहे. राम दरबार देखावा उभारण्यात आला. गंगाआरतीच्या धर्तीवर महाआरती, गुढीपाडवा ते रामनवमी याकालावधीत जन्मणारे बाळांना पाळण्याचे वाटप आदी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम समितीच्यावतीने करण्यात आली. गांधी रोडवरील छोट्या राम मंदिरातदेखील भजन व कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले.

 

Web Title: Enthusiasam of Ramnavami in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.