प्रवेश समिती सदस्यांच्याच कॉलेजकडून लूट!
By admin | Published: July 13, 2017 01:53 AM2017-07-13T01:53:25+5:302017-07-13T01:54:28+5:30
पालकांची तक्रार: अतिरिक्त शुल्काची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रवेश अर्जामध्येच शिक्षण शुल्क निर्धारित केले असतानाही शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालये पैसे कमाविण्याच्या लालसेने निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतील सदस्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडूनच विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यात येत होती.
त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन यंदा अकोला शहरातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय; परंतु आॅफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरी मिळवून दिली. यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रवेशासंदर्भातील नियोजन करून विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षण शुल्क निर्धारित केले. या शिक्षण शुल्कानुसारच कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करण्याससुद्धा समितीने बजावले होते. या समितीमध्ये असलेल्या तीन ते चार सदस्यांचे स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या समिती सदस्यांच्याच महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत आहे. समितीने शिक्षण शुल्क निर्धारित केल्यानंतरही समिती सदस्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षण शुल्काव्यतिरिक्त वेगवेगळ्या नावांखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. समिती सदस्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट होत असेल, तर इतर कनिष्ठ महाविद्यालयांमधील काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची लूट थांबवावी. अशी मागणी पालकांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे केली आहे.
शहरातील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अकरावी प्रवेशासाठी निर्धारित शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्काची मागणी करीत असेल, तर तो नियमाचा भंग आहे. पालक, विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. अधिक शुल्क घेणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश रद्द केले जातील. पालकांनी न घाबरता तक्रार द्यावी.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी