प्रवेशद्वारावरून शिवसेनेचा कांगावा
By admin | Published: June 26, 2015 01:54 AM2015-06-26T01:54:42+5:302015-06-26T01:54:42+5:30
अकोला मनपामधील प्रकार; शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली.
अकोला: मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासाठी प्रशासनाने निविदा प्रकाशित करताच, शिवसेनेने १५ दिवसाच्या आत काम सुरू करण्याचा इशारा देत कांगावा सुरू केला. तर मागील नऊ महिन्यांपासून मनपात भाजप-सेनेची सत्ता असताना आजपर्यंत महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रवेशद्वाराचा ठराव का मंजूर केला नाही,असा आरोप करीत प्रवेशद्वाराबद्दल शिवसेनेची आस्था बेगडी असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी गुरुवारी केला. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्याचा ठराव भाजप नगरसेवक सतीश ढगे यांनी तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या समक्ष मांडला होता. ठराव मंजूर झाला; मात्र तेव्हापासून प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी आयोजित केलेल्या सभेत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी प्रवेशद्वाराचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेवकांचे मानधन देण्याचा प्रस्ताव सादर केला होता; परंतु भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यावेळी २0 लक्ष रुपये मनपा निधीतून प्रवेशद्वाराचे काम सुरू करण्याचे निर्देश महापौर देशमुख यांनी दिले होते. तसा ठरावदेखील महापौरांनी मंजूर केला; परंतु जून महिन्यापर्यंंत महापौरांनी ठरावाची प्रत बांधकाम विभागाला दिली नसल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांनी विरोधी पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीत दिली होती.