कृषी विद्यापीठाने घडविले उद्योजक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:06+5:302021-04-29T04:14:06+5:30

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना ...

Entrepreneurs formed by Agriculture University! | कृषी विद्यापीठाने घडविले उद्योजक!

कृषी विद्यापीठाने घडविले उद्योजक!

Next

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील एकमेव ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून निवड करून प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारद्वारे २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १३ जणांना अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे. हे इंक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेंतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले जाते. कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य पुरविणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सेंटरमार्फत १३ जणांची निवड झाली आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

--बॉक्स--

इंक्युबेशन सेंटरतर्फे मिळतात या सुविधा

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इंक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

--बॉक्स--

तीन टप्प्यांत अर्थसाह्य

या सेंटरमार्फत निवड झालेल्या व्यक्तीला तीन टप्प्यांत अर्थसाह्य मिळते. पहिल्या टप्प्यात ४०, दुसऱ्या टप्प्यात ४० व तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी मिळतो. त्यावेळी त्या व्यक्तीला पुढील वर्षभरात काय काम करणार असल्याची विचारणा केली जाते. यामध्ये काही अडचण आल्यास सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

--बॉक्स--

दुसऱ्या तुकडीत ३४ जणांचा समावेश

कृषी आधारित उद्योग उभा करण्यासाठी तीन सादरीकरण आवश्यक आहेत. पहिल्या तुकडीत १३ जणांची निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या तुकडीत ३४ जणांची तिसऱ्या टप्प्यातील सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

--बॉक्स--

...अन्यथा मशनरी जप्तीची कारवाई

उद्योग उभा करताना प्रशिक्षणार्थी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास पुढील अर्थसाह्य थांबविता येते. याबाबत त्या व्यक्तीसोबत करार केला जातो. तसेच मशनरी जप्तीची कारवाईसुद्धा करण्यात येऊ शकते. ही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, याकरिता सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.

--कोट--

आतापर्यंतच्या योजनांमध्ये ही योजना संजीवनी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याकरिता सेंटरमार्फत योग्य मार्गदर्शन केल्या जाईल.

डॉ. संतोष गहूकर, सीईओ व हेड, ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर, डॉ. पंदेकृवि.

Web Title: Entrepreneurs formed by Agriculture University!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.