धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:20 AM2024-04-15T06:20:19+5:302024-04-15T06:21:39+5:30

मतविभाजन टाळण्यावर उमेदवार देत आहेत भर

Entry of Patals in Dhotre, prakash Ambedkar, who will benefit | धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

मनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला
:  विदर्भातील प्रमुख मतदारसंघांपैकी एक अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपचे संजय धोत्रे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, अशी लढत होत आली. यावेळी संजय धोत्रे नसले तरी त्यांच्या रुपाने त्यांचाच मुलगा अनुप धोत्रे विरुद्ध आंबेडकर अशी लढत कायम असून, त्यांच्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्या रुपाने तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे. या तिघांतच खरी चुरस असून, मत विभाजन टाळत कोण बाजी मारणार हे येत्या ४ जूनला स्पष्ट होईल. सन १९८९ पासून अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला आहे. मध्ये दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. 

मात्र, गत चार निवडणुकांमध्ये भाजपचे संजय धोत्रे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आले आहे. यावेळी आजारपणामुळे त्यांच्या जागी पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून भाजपात अंतर्गत धुसफूस दिसून आली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष परिणाम सध्या प्रचारात उघडपणे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेस व वंचितमध्ये होणारे मत विभाजन हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा राहिला आहे. यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलून बहुसंख्य गटातील उमेदवार दिल्याने मत विभाजनाचा धोका आता भाजपसाठीही महत्त्वाचा झाला आहे. तिन्ही उमेदवारांमध्ये होणारे मतांचे विभाजन हे मतदारसंघाच्या निकालावर प्रभाव टाकणारे ठरणार आहे. ते टाळण्यासाठी तिन्ही उमेदवार भर देताना दिसून येत आहे.

तिरंगी लढतीत कोणी मारली यापूर्वी बाजी?
अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत होत आलेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होत आला आहे. यावेळी मतविभाजन हे काँग्रेस व वंचितमध्ये होणार, अशी अपेक्षाच आहे. मात्र, त्यासोबतच काँग्रेस व भाजपमध्येही मतविभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यावेळी मतविभाजनाचा नेमका कुणाला फायदा होणार याबाबत संभ्रम आहे. प्रमुख तिन्ही उमेदवारांकडून मतविभाजन टाळण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला जात असून, त्यासाठी बैठका घेतल्या जात आहे. यात कुणाला यश येते हे बघणे उत्सुकतेचे आहे. 

एकूण मतदार    १८,९०,८१४ 
पुरुष - ९,७७,५००
महिला - ९,१३,२६९
 
निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

  • गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपचे संजय धोत्रे, त्यापूर्वी तीन वेळा भाऊसाहेब फुंडकर खासदार होते. या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात आला नाही.
  • सिंचन सुविधांचा अभाव आहे. येथे शेतीवर आधारित एकही प्रकल्प नाही.
  • बेरोजगारीच्या प्रश्नासोबतच खारपाणपट्ट्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत.

२०१९ मध्ये काय घडले?
संजय धोत्रे    भाजप (विजयी)    ५,५४,४४ 
प्रकाश आंबेडकर    वंचित बहुजन आघाडी    २,७८,८४८
हिदायत पटेल    काँग्रेस    २,५४,३७०
नोटा    -    ८,८६६

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के
२०१४    संजय धोत्रे     भाजप         ४,५६,४७२    ४७%
२००९    संजय धोत्रे     भाजप        २,८७,५२६    ३९%
२००४    संजय धोत्रे    भाजप        ३,१३,३२३    ४३%
१९९९    प्रकाश आंबेडकर    वंचित        २७२२४३    ४१%
१९९८    प्रकाश आंबेडकर    वंचित        ३६६४३७       ५१%

Web Title: Entry of Patals in Dhotre, prakash Ambedkar, who will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.