‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत जागांवर लवकर प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:37 PM2019-01-25T13:37:36+5:302019-01-25T13:37:46+5:30
अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शाळा वगळता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते.
अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शाळा वगळता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यंदासुद्धा २0१९-२0 साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
दरवर्षी शिक्षण विभागामार्फत वंचित व दुर्बल गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि. जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी, एचआयव्ही बाधित, प्रभावित बालके आणि ज्या बालकांच्या पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे. अशा बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत देण्यात येतो. गतवर्षी अकोला जिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या २0८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २४८२ जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन व लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. २४८२ जागांसाठी जिल्हाभरातून एकूण ४ हजार ९८७ अर्ज आले होते. त्यानुसार १९७0 विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. यंदासुद्धा एवढ्याच जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)