पर्यावरण रक्षणासाठी घेतली जाणार ‘हरित शपथ’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:14 AM2021-01-01T10:14:32+5:302021-01-01T10:15:18+5:30
Envirn उपक्रम १ ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी ‘हरित शपथ’ घेण्याचा उपक्रम १ ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या निर्णयानुसार पृथ्वी,वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून राज्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘माझी वसुंधरा’ अभियांनांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या आनुषंगाने ‘हरित शपथ’ घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींमधील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालययांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सामूहिक व वैयक्तीकरीत्या ‘हरित शपथ’ घेण्यात येणार आहे. सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात घेण्यात येणाऱ्या ‘हिरत शपथ’ची नोंद ‘माझी वसुंधरा’ या ‘वेब पोर्टल’वर घेण्याच्या सूचना माझी वसुंधरा अभियानचे संचालक सुधाकर बोबडे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना २९ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिल्या आहेत.
आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन घेतली जाणार शपथ !
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ‘हरित शपथ’ घेण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा, शहर व ग्रामस्तरावर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये उपस्थित कर्मचारी व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन ‘हरित शपथ’ घेण्यात येणार आहे.
‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह स्वयंसेवी संस्थांच्या वतीने ‘हरित शपथ’ घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने ‘हरित शपथ’ घेण्यात येणार आहे.
- राहुल शेळके, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, अकोला