शेतमालाच्या निर्यातीसाठी ‘एपीडा’ मदत करणार -प्रशांत वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:33 AM2017-12-29T01:33:19+5:302017-12-29T01:33:30+5:30
अकोला : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) शेतकर्यांना मदत करणार, अशी माहिती एपीडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आयोजित ‘कृषी निर्यातीमध्ये एपीडाची भूमिका’ या चर्चासत्रात ते बोलत होते.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रशांत वाघमारे यांनी, कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) शेतकर्यांच्या कृषी उत्पादन आणि कृषी प्रक्रिया मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाचा दर्जा पाहून, तो शेतमाल विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी एपीडा मार्गदर्शन करते. त्यांना प्रशिक्षण देते. एपीडाच्या माध्यमातून शेतकर्यांची निर्यातदारांसोबत भेट घालून, त्यांच्या शेतमालाची पाहणी केली जाते.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी उद्योजक झाले आहेत. विदर्भातील शेतकरीसुद्धा निर्यातीकडे वळावे, या दृष्टिकोनातून एपीडाने विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले आहे. चांदूर रेल्वे येथील शेतकर्यांची ३00 टन मिरची दुबई व कतार येथे निर्यात करण्यात आली.
त्याचा त्यांना चांगला नफाही मिळाला. त्यामुळे अकोला, वाशिम व अमरावती जिल्हय़ांमधील शेतकर्यांनी शेतमालाच्या निर्यातीकडे वळले पाहिजे, असे मार्गदर्शन एपीडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी केले.
अकोटच्या केळींना दुबईत मागणी
अकोट तालुक्यातील काही शेतकर्यांची एपीडाने निर्यातदारांसोबत भेटी घालून दिल्या. निर्यातदारांनी त्यांच्या केळींचे नमुने पाठविले. केळी दर्जेदार असल्याने, दुबईतील व्यापार्यांनी मागणी केली.