ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा मोर्चा
By admin | Published: July 13, 2017 08:16 PM2017-07-13T20:16:35+5:302017-07-13T20:16:35+5:30
अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघून भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन मागण्यांचे निवेदन आयुक्त गिरिराज शर्मा यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त गिरिराज शर्मा यांनी पेन्शनधारकांच्या मागण्या शासनाकडे पाठवून आलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था बँकांमध्येच करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कामगार नेते देवराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. राजेंद्र भातुलकर, एम. टी. इंगळे, गोपाल मांडेकर, मुकुंद गावंडे, डी. बी. भुसे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक रमेश गायकवाड यांनी केले. मोर्चात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमधून आलेले पेन्शनधारक सहभागी झाले होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी हिवराळे, शर्मा, पंत, देशमुख, कुटे, गणगणे, देवरे, दही, आढाव, व्यवहारे, मारोडे, अंधारे, काळे, फिरगे, भराटे, अंबादास ठाकरे, आर. एन. राऊत आदींनी सहकार्य केले.
या आहेत मागण्या
- महिना ६५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता.
- कोशियारी समितीच्या शिफारशी अंतरिम वाढ म्हणून लागू करा.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा.
- वेटेज पेमेंट पूर्ण करा.
- विधवांना पतीच्या वेटेजची रक्कम द्या.
- विकलेल्या पेन्शनची १०० महिन्यांमध्ये भरपाई करा.
- पेन्शनधारकांना सरकारी खर्चाने ई.एस.आय. लागू करा.
- पेन्शनधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या.
- पेन्शन खात्याला झीरो बॅलेन्सची सुविधा सुरू ठेवा.