बाळापूर शहरात कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या पोहोचली शतकाच्या उंबरठ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:18 AM2021-04-06T04:18:21+5:302021-04-06T04:18:21+5:30
बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी शहरात ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून ...
बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी शहरात ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, शहराची एकूण रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २२ असून, या रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.
शहराची एकूण रुग्णसंख्या ९३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडी बाजारपेठेतील व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केल्याशिवाय दुकान उघडू नये, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी, न. प. मुख्याधिकारी जी. एस. पवार यांनी केले होते. नगर परिषद कार्यालयात आयोजित स्वॅब तपासणी मोहिमेत १२२ जणांची तपासणी केली. त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारी शहरातील ७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना तपासणी केल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यासाठी तीन दिवस उशीर होत असल्याने तपासणी केलेले संदिग्ध रुग्ण शहरात फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना तपासणी केलेल्यांना तपासणी अहवाल तत्काळ द्यावा अथवा अहवाल येईपर्यंत घरीच राहण्याची ताकीद द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
------------------------------------------
शहरातील नागरिकांनी तोंडाला मास्क बांधून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात संपर्क करून उपचार करावे. प्रथम अवस्थेत असल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय महसूल अधिकारी, बाळापूर.