बार्शीटाकळी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या पोहोचली ७९६ वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:16 AM2021-04-03T04:16:07+5:302021-04-03T04:16:07+5:30
गजानन वाघमारे बार्शीटाकळी: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक ...
गजानन वाघमारे
बार्शीटाकळी: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र असून, ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सद्यास्थितीत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ७९६ वर पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ७९६ पोहोचली आहे. प्रशासनामार्फत कोवीड प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसत नसल्याने कोरोनाचा दैनदिन आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी एक देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास रुग्णाचा परिसर सील करणे, इतर उपाययोजना केल्या जात होत्या; मात्र सद्यस्थितीत तसे न केल्या जात असल्याचे चित्र आहे. होम क्वारंटीन असलेले रुग्ण दिवसभर शहरात वावरताना दिसून येत आहेत. तसेच बाजारपेठ, तहसील कार्यलय, पंचायत समीती कार्यालय, जुने बसस्थानक, पेट्रोल पंप, किराणा दुकाणे, दुध डेअरी , भाजी दुकाने आदी परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, नागरिक विनामास्क मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. बाशिटाकळी शहर कोरोना हॉटस्पाट होण्याची प्रशासन वाट पाहत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ( तालुका प्रतिनिधी )
-----------------------
बार्शीटाकळी शहरासह तालुक्यात कोरोनाविषय नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केल्या जाईल. कोविड टेस्टींग वाढविण्यावर भर देणार आहे. -गजानन हामंद, तहसिलदार बार्शिटाकळी.