शहरात उद्रेक; ३३५ जण काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:44+5:302021-04-30T04:22:44+5:30
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही ...
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. राज्य शासनाने लागू केलेले कडक निर्बंध झुगारून देत नागरिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्याचे परिणाम सर्वांना भाेगावे लागत आहेत़ बुधवारी शहरातील तब्बल ३३५ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे़
पूर्व व दक्षिण झाेनमधील स्थिती गंभीर
शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. दाेन्ही झाेनमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता हाॅटस्पाॅट ठरलेल्या या झाेनमध्ये उपाययाेजना करण्यास प्रशासन सरसावले आहे. बुधवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल १६१ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ४६, उत्तर झोनमध्ये ४१ व दक्षिण झोनमध्ये ८७ असे एकूण ३३५ रुग्ण आढळून आले आहेत.
चाचणीसाठी धावाधाव
काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून चाचणीसाठी नागरिक आता धावाधाव करीत आहेत़ सद्यस्थितीत शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू केले़ या ठिकाणी बुधवारी १५२९ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ४३६ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच १०९३ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली. संबंधितांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़