अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 10:49 AM2021-06-02T10:49:09+5:302021-06-02T10:49:15+5:30
Akola News : अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली; मात्र या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा नाही.
अकोला : कोरोना काळात एसटी महामंडळातील कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महामंडळाची अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली; मात्र या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लस मिळत नाही व पंपावर पेट्रोल मिळत नसल्याने अवहेलना होत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाने राज्याच्या बाहेर सेवा दिली. हजारो किलोमीटर प्रवास करीत मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले. कोरोनाकाळात एसटीची सेवा देताना चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. राज्यात एसटीचे एकूण २०० पेक्षाही अधिक कर्मचारी कोरोनामुळे दगावले. यात जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक असतानाही एसटीच्या गाड्या अत्यावश्यक सेवेसाठी धावत होत्या. मुंबई बेस्टच्या मदतीलाही एसटीच्या गाड्या चालवण्यात आल्या. त्यासाठी अकोल्यातून चालक, वाहक पाठविण्यात आले. या सेवा देताना कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढू लागली. अजूनही अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे; मात्र या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरणही होऊ शकत नाही, यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची अवहेलना होत आहे.
जिल्ह्यातील एसटी कर्मचारी
१७००
आतापर्यंत कोरोनाबाधित कर्मचारी
९८
कोरोनामुळे मृत्यू झालेले कर्मचारी
३
लसीकरण झालेले कर्मचारी
३७८
वयोमर्यादेनुसार केले लसीकरण
४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लसीकरण केंद्रात रांगेत उभे राहून लसीकरण घ्यावे लागत आहे. त्यात जाणारा वेळ आणि रांगेतही उभे असणाऱ्यांची मोठी संख्या पाहता अनेक कर्मचारी लसीकरण केंद्राकडेही जात नाहीत.
रांगेतून काढले बाहेर
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयोमर्यादेत बसत नसलेला एखादा कर्मचारी रांगेत लागल्यास, त्याला रांगेतून बाहेर काढल्या जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यादीत नाव नसल्याने पेट्रोल मिळेना!
एसटी महामंडळाची अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी वाहतूक सुरू आहे. तसेच माल वाहतूकही सुरू आहे. घरापासून एसटी आगारापर्यंत येण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वत:ची मोटरसायकल वापरावी लागते; परंतु अत्यावश्यक सेवेतील वेळेत या कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या यादीत तुमचे नाव नाही, असे सांगितले जाते.
शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वगळले आहे. कोरोना काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राजस्थान व इतर राज्यापर्यंत सेवा दिली; मात्र या कर्मचाऱ्यांना ना लस मिळते ना पेट्रोल. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाइनमध्ये समावेश करावा.
- रुपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना.