प्रस्थापित राजकीय पक्ष "ओबीसी" आरक्षणाच्या विरोधात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:49+5:302021-07-18T04:14:49+5:30
अकोला : कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता, प्रस्थापित राजकीय पक्ष ''ओबीसी'' आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत, असा आरोप ...
अकोला : कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता, प्रस्थापित राजकीय पक्ष ''ओबीसी'' आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शनिवारी येथे केला.
पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यावर आल्या असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यापूर्वी सत्तेवर राहिलेल्या राजकीय पक्षांनी राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याच्या मुद्द्याला बगल दिली. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले. त्यानुषंगाने ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आणण्याचे काम प्रस्थापित राजकीय पक्ष करीत असल्याचा आरोप रेखा ठाकूर यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण नसले तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना प्रतिनिधित्व दिल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, गोविंद दळवी, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, सविता मुंडे, किरण गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देडवे, प्रभा शिरसाट, आदी उपस्थित होते.
जि. प. पोटनिवडणुका थांबविण्याची
वेगळी राजकीय कारणे!
कोरोनाच्या नावाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या; मात्र या पोटनिवडणुका थांबविण्याची वेगळी राजकीय कारणे असल्याचा आरोप रेखा ठाकूर यांनी यावेळी केला.
पक्षात बेशिस्त, त्रुटी;
परिवर्तनासाठी कामाची गरज!
पक्षात अनेक ठिकाणी बेशिस्त आणि त्रुटी आहेत. त्या दूर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्याकरिता टप्प्याटप्प्याने पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेण्यात येत आहेत, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.