२४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 03:00 PM2019-12-22T15:00:49+5:302019-12-22T15:00:55+5:30
मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेतील पाणीपट्टी वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी मनपात समाविष्ट २४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर टाकली जात आहे. मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे.
महानगरपालिका अंतर्गत शहरात व समाविष्ट झालेल्या २४ गावांमधील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या देयकाची पाणीपट्टी वसुली सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या आवारात जलप्रदाय विभागामार्फत एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येत असल्याने नागरिकांना पाणीपट्टी देयक भरण्यास त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणीपट्टी वसुली कमी प्रमाणात होत असून, महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात घट होत आहे.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोन कार्यालयाकडून जलप्रदाय विभागाची पाणीपट्टी वसुली करणे आवश्यक असल्याने क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करण्यात येते की, नागरिकांच्या सोयीकरिता व मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने झोनमधील पाणीपट्टीच्या देयकाची वसुली वाढविली जात आहे.
प्राप्त होणाºया पाणीपट्टी देयकाची पोचपावती जलप्रदाय विभागात जमा करण्याबाबत आस्थापना लिपिकांना निर्देश देण्यात आले आहेत.
पाणीपट्टी वसुलीकरिता लागणारे पावती पुस्तक, भरणा रजिस्टर व चालान पुस्तक महापालिकेच्या भांडार विभागाकडे उपलब्ध करण्यात आले आहे. ही वसुली आगामी १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.