अकोला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Updated: October 27, 2023 17:56 IST2023-10-27T17:55:34+5:302023-10-27T17:56:03+5:30
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय

अकोला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
अकोला : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यानुसार यासंदर्भात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी आदेश निर्गमित केला.
अकोला शहरातील बाजारपेठा, गांधी चौक, खुले नाट्यगृह परिसर, कापड बाजार, शाळा, महाविद्यालयाचा परिसर, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने नो पार्किंग झोनमध्ये उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, नागरिकांना नियम व तरतुदी समजावून सांगणे, अशा ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करणे यासाठी फिरते पथक स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यानुसार पथक स्थापन्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला.
पथकात यांचा आहे समावेश
आदेशानुसार, वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अधिकारी प्रवीण मिश्रा यांचा या पथकात समावेश आहे.
दंडात्मक कारवाइ करा;दर शुक्रवारी अहवाल सादर करा !
स्थापन करण्यात आलेल्या पथकाने विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, वाहतूक नियम मोडणाऱ्या नागरिकांना नियमांची माहिती द्यावी. आठवड्यातील कारवाईचा अहवाल दर शुक्रवारी सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात देण्यात आले आहेत.