दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:56 AM2020-11-04T10:56:54+5:302020-11-04T10:59:31+5:30
Akola Market News दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचे भाव वधारल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
अकोला: ऐन दिवळीच्या तोंडावर खाद्यतेलाचे भाव वधारल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. गत दोन महिन्यात मोहरी आणि सूर्यफूल तेलाच्या पाठोपाठ फल्ली आणि सोयबीनचेही दर वाढले आहेत. सद्यस्थितीत मोहरी १६०, तर सूर्यफूल १२५ रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे. दिवाळी म्हटली की, घरोघरी फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यामुळे या काळात तेलाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचे भाव वधारल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. मागील तीन महिन्यात मोहरी पाच ते दहा रुपयांनी, तर सूर्यफूल १५ रुपये प्रति किलोने वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. या पाठोपाठ फल्ली आणि सोयाबीन तेलातही गत महिन्याच्या तुलनेत २ ते ३ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चुकणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी
भारतात अर्जेंटिनामधून सर्वाधिक खाद्यतेल आयात केले जात असून, येथे तेलाचे दर वाढले आहेत. शिवाय, केंद्र सरकारकडून त्यावर ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत कर लावण्यात येतो. त्यामुळे बहुतांश खाद्य तेलाचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय, भुईमूग चीनला निर्यात करण्यात येत असल्याने त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेला होत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
असे आहेत तेलाचे दर
तेल ऑक्टोबर - नोव्हेंबर (दर प्रतिकिलो )
शेंगदाणा - १४५ - १५०
साेयाबीन - ९८ - १०२
सूर्यफूल - ११५ - १२५
मोहरी - १५० - १६०
पाम तेल - ९० - ९३
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती तेजीत आहेत. प्रामुख्याने अर्जेंटिना व मलेशियामध्ये तेल महागले असून शासन त्यावर ४० ते ४५ टक्के करही लावते. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. शासनाने कर कमी केल्यास त्याचा सर्वसामान्यांना लाभ होईल.
- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला
दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ निर्मितीसाठी तेलाचा जास्त वापर होतो. असातच ऐन दिवाळीत तेलाच्या किमती वाढल्याने बजेट कोलमडणार आहे.
- धनश्री वंजारे, गृहिणी, अकोला