प्रखर विरोधानंतरही वानचे पाणी पळविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:50+5:302020-12-11T04:45:50+5:30

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा ...

Even after intense opposition, Wan's water was stolen! | प्रखर विरोधानंतरही वानचे पाणी पळविले !

प्रखर विरोधानंतरही वानचे पाणी पळविले !

Next

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा कोरडा असल्यावरही वानच्या पाण्याचे राजकारण आणि सत्तेचा वापर करून बाळापूरला पाणी पळविण्यात आले. आधी बटालियन कॅम्प आणि आता वानचे पाणी पळविण्यात आले. यावरून तालुक्यातील लोकप्रतिनिधींची शासन दरबारी काय किंमत आहे हे दिसून येते. प्रखर विरोध असताना, एक लोकप्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील पाणी पळवून नेतो आणि तालुक्यातील नेतेमंडळी बोटचेपी भूमिका घेतात. याविषयी जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.

बाळापूर येथे वानचे पाणी नेल्यास स्थानिक शेतकऱ्यांना सिंचन किंवा पिण्याचे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्यात धरण असूनही येथील जनतेचा घसा कोरडा आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील वानचे पाणी दुसऱ्या मतदारसंघात जाऊ नये. यासाठी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पाठपुरावा करून आंदोलन केले. निवेदन दिले. बाळापूरसह अकोला येथील अमृत योजनेकरिता झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रखर विरोध होत असताना पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा वानचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, असे आश्वासनच नव्हेतर कार्यकारी अभियंत्यांना नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही बाळापूर पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अकोट व तेल्हारा तालुक्यातील १५९ गावांचा प्रस्ताव हा त्रुटीअभावी परत पाठविला. वान प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून हा प्रस्ताव थंडबस्त्यात टाकण्यात आला आणि बाळापूर पाणीपुरवठ्याला मात्र, थेट मंत्रालयातून मंजुरी मिळते. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. बाळापूरला पाणी गेल्यास तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर होणार असल्याचे चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे बाळापूरच्या पाणीपुरवठा प्रस्तावाला स्थगिती देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नेते किती ताकद लावतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आता रस्त्यावर उतरण्याची तयारी हवी !

तालुक्यातील पाणी इतरत्र जाऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र त्याचे काही फलित झाले नाही. त्यामुळे वानचे पाणी रोखण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची मानसिकता हवी. नावापुरता विरोध न करता, जनतेनेही त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असा विचार वान प्रकल्प आंदोलन समिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहेे.

तेल्हारा तालुक्यातील वानचे पाणी बाळापूरला पळवून नेणे हा येथील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बाळापूर पाणीपुरवठ्याला स्थगिती मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांच्यासोबत चर्चा येत्या अधिवेशनात शासनाला निर्णय घेण्यास बाध्य करेल.

अमोल मिटकरी, आमदार विधान परिषद

शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यामध्ये कपात होणार नाही. मी सध्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असून, परत आल्यानंतर जनता व शेतकरी यांच्या हितासाठी प्रयत्न करणार.

बच्चू कडू, पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री

यापूर्वीच शासनाला पत्र देऊन माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाचे पाणी देण्यास विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडीने शासनाने पाण्याचे राजकारण करून स्थानिक शेतकरी व जनतेवर अन्याय केला. जनतेला विश्वासात घेऊन शासनाने निर्णय घ्यावा.

प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट मतदारसंघ

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. जनतेसाठी लढा देऊ. परंतु धरणातील पाणी इतरत्र जाऊ देणार नाही.

विजय मोहोड, तालुकाप्रमुख, शिवसेना, तेल्हारा

बाळापूर तालुक्यात नद्या, पाणीसाठा मुबलक असताना, वानचे पाणी पळवून नेण्यामागे काय प्रयोजन आहे. तेल्हारा तालुक्यातील जनतेलाच पाणी मिळत नाही. अशा बाळापुरला पाणी हा अन्याय आहे. या निर्णयाविरोधात पाठपुरावा करू.

डॉ. संजीवनी बिहाडे, प्रदेश उपाध्यक्ष, महिला काँग्रेस

Web Title: Even after intense opposition, Wan's water was stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.