पावसाळा सुरू झाल्यावरही पाणीटंचाई निवारणाची ४७३ कामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:23 AM2020-07-06T10:23:46+5:302020-07-06T10:23:55+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ११३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ११३ कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असताना, कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३५६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहे. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत संपल्याच्या पृष्ठभूमीवर कृती आराखड्यातील प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची कामे आता पूर्ण होण्याची शक्यता नाही.
३.३५ कोटींचे अनुदान प्रलंबित!
पाणीटंचाई निवारणासाठी ११३ उपाययोजनांच्या देयकांपोटी ३ कोटी ३५ लाख ७ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त होणे अध्याप प्रलंबित आहे.