आदेशानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:49 PM2018-12-11T13:49:42+5:302018-12-11T13:49:46+5:30
शिक्षकांना शाळेत रुजू होण्याचा आदेशसुद्धा देण्यात आल्यानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अकोला: जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील ६२ अतिरिक्त शिक्षकांची रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. या शिक्षकांना शाळेत रुजू होण्याचा आदेशसुद्धा देण्यात आल्यानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेक अतिरिक्त शिक्षकांचे ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आल्याने, ते शाळांमध्ये रुजू होत नसल्याचे दिसत आहे.
शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ६२ अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन केले. दोन दिवसात त्यांना शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेशपत्रसुद्धा दिले. ६२ अतिरिक्त शिक्षकांपैकी शहरातील शाळांमध्ये समायोजन झालेले शिक्षक शाळांमध्ये रुजू झाले; परंतु अनेक अतिरिक्त शिक्षकांना ग्रामीण भागातील शाळांमध्ये करण्यात आलेले समायोजन पसंतीस पडले नाही. काही शिक्षक ग्रामीण भागातील शाळांमध्ये गेले तर त्यांना शाळा रुजू करून घेत नसल्याच्या तक्रारी शिक्षक करू लागले आहेत. यासोबतच समायोजन करताना, काही शाळांमध्ये बीएससी बीएडऐवजी डीएड शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्यामुळे शाळांकडून डीएड शिक्षक नको तर बीएससी शिक्षक पाहिजे. असल्याची मागणी समोर आली. त्यामुळे काही डीएड शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे आता ज्या शाळांमध्ये बीएससी शिक्षक देऊन डीएड शिक्षकांना इतर शाळांमधील रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे. ज्या शाळा रुजू घेण्यास अतिरिक्त शिक्षकांना नकार देत आहेत, त्या शिक्षकांचेसुद्धा इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यामुळे अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक अद्याप शाळांमध्ये रुजू झाले नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)