घराचे सर्वेक्षण केल्यानंतरही शाखा अभियंताच्या दिरंगाईमुळे निराधार कुटुंब वाऱ्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:10+5:302021-09-03T04:20:10+5:30
सदर घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून पंचनामा केल्यानंतर अवघ्या काही ...
सदर घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून पंचनामा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच निराधार कुटुंबाला तत्काळची पाच हजार रुपयांची मदत दिली होती. परंतु घराची दुरुस्तीसाठी स्थळ निरीक्षण करून मूल्यांकन अहवाल सादर करण्याचे पत्र तहसीलदार यांनी पंचायत समितीच्या शाखा अभियंता यांना ३ ऑगस्ट रोजी दिले होते. परंतु शाखा अभियंता यांच्या दिरंगाईमुळे सदर घराचे निरीक्षण एक महिन्यानंतर २ सप्टेंबर रोजी करण्यात आले, त्यामुळे हेतूपरस्पर निराधार कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. तहसीलदार यांच्या पत्रावर त्वरित निरीक्षण करून अहवाल सादर करणे अपेक्षित होते. परंतु शाखा अभियंता यांच्या हेकेखोरपणा मुळे घराचे निरीक्षण एक महिन्यानंतर करण्यात आल्याने निराधार कुटुंबाला दुरुस्तीसाठी दिल्या जाणारी आर्थिक मदतीपासून विलंब होणार आहे. त्यामुळे निरीक्षण करण्यास विलंब करणाऱ्या अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत शाखा अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
फोटो:
तहसीलदारांचे पत्र धूळखात
नैसर्गिक आपत्ती शासन निर्णयाचे मदत देय आपदग्रस्तांचे मूल्यांकन व घराचे निरीक्षण करण्यासाठी प्रथम प्राधान्याने करण्याची दक्षता घ्यावी असे तहसीलदारांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे. तरीही महिनाभरापर्यंत सदर पत्र धूळखात होता.
माझ्या घराची पडझड झाल्याने तहसीलदार यांच्याकडून तत्काळची मदत मिळाली. परंतु घर दुरुस्तीसाठी तहसीलदाराने शाखा अभियंता यांना निरीक्षण करण्याचे पत्र दिले होते. त्यावर शाखा अभियंता यांनी एक महिन्यानंतर निरीक्षण केले आहे. त्यामुळे हेतुपरस्पर निरीक्षण करण्यास विलंब करण्यात आला आहे.
-शेख अकील शेख जुगण, खेट्री