वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे!

By संतोष येलकर | Published: June 20, 2023 03:52 PM2023-06-20T15:52:25+5:302023-06-20T15:53:13+5:30

दुष्काळाचे सावट : जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा

even after twenty days the rain not continued in akola | वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे!

वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे!

googlenewsNext

संतोष येलकर, अकोला: यंदाचा पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून जात असताना, पाऊस रुसलेलाच असल्याने, जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक दमदार पाऊस बरसणार तर कधी, याबाबतची प्रतीक्षा करीत जिल्ह्यातील बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागल्याचे वास्तव आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊन १९ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नसून, जिवाची लाही लाही करणाऱ्या तापत्या उन्हाचा कडाका सुरूच आहे. पावसाळा तोंडावर असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी केली. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांच्या खरेदीचे नियोजनही केले.

परंतु, पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, पाऊस रुसलेलाच असल्यामुळे जिल्ह्यात अद्यापही खरीप पेरण्यांना सुरुवात होऊ शकली नाही. दमदार पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या मार्गी लागण्यासाठी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा करीत शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागल्याचे वास्तव आहे.

गेल्यावर्षी १९ जूनपर्यंत पडला होता ६३ मि.मी.पाऊस; यंदा मात्र पत्ता नाही !

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात १९ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६३ मिलीमीटर पाऊस बरसला होता. त्यामध्ये २ जूनला १.२ मि.मी. ६ जूनला ०.१ मि.मी., १० जून रोजी ३.४ मि.मी., ११ जून रोजी ०.५ मि.मी., १२ जून रोजी १२.५ मि.मी., १३ जून रोजी १.१ मि.मी., १५ जून रोजी १.८ मि.मी., १६ जून रोजी ४.८ मि.मी., १७ जून रोजी ३४ मि.मी. आणि १९ जून रोजी ३.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली होती.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन १९ दिवस उलटून गेले; मात्र १९ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. सार्वत्रिक दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: even after twenty days the rain not continued in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.