लॉकडाऊन काळातही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:49+5:302021-05-16T04:17:49+5:30
प्रशांत विखे तेल्हारा : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असे असतानाही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून पीक ...
प्रशांत विखे
तेल्हारा : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असे असतानाही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून पीक विम्यापोटी १३६ कोटी रुपये वसूल करून केवळ ७७ कोटी रुपये मंजूर केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर केला, याबाबत विमा कंपन्यांनी अद्यापही कृषी विभागाला अधिकृत कळविले नसल्याची माहिती आहे.
गत अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामाच्या पिकांसाठी पीक विमा काढला. खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने पीक विम्याची रक्कम मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. दरम्यान, गतवर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला, त्यापैकी कोणत्या पिकाला किती पीक विमा मंजूर केला, याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला अधिकृत माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यंदा खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जेवढे वसूल केले तेवढे तरी द्या!
जिल्ह्यासाठी ज्या पीक विमा एजन्सीची शासनाने नियुक्ती केली होती, त्या कंपनीने शेतकरी, राज्य शासन, केंद्र सरकार यांच्याकडून तब्बल १३६ कोटी रुपये वसूल केले; मात्र पीक विम्यापोटी केवळ ७७ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
------------------------------
मूग, उडीद पिकासाठी पीक विमा मंजूर झाला आहे. सोयाबीन, कपाशी, ज्वारी यासाठी खूप कमी क्षेत्रफळ मंजूर झाले असल्याची माहिती आहे; मात्र अधिकृत माहिती अद्यापही विमा कंपनीकडून प्राप्त झाली नाही.
-कांतआप्पा खोत, प्र. जिल्हा कृषी अधीक्षक, अकोला.
----------------------------
पीक विमा कंपनीचे उत्तर देण्यास टाळाटाळ!
अकोला जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती न देता टोलवाटोलवी करून वेळ मारून नेली.