‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:24 AM2020-09-09T10:24:26+5:302020-09-09T10:25:59+5:30
‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे.
- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत उद्योग-व्यवसाय बंद पडल्याच्या स्थितीत गावी गेलेले जिल्ह्याबाहेरील आणि परप्रांतातील मजूर-कामगार अद्यापही जिल्ह्यात परतले नाही. त्यामुळे मजूर-कामगारांचा तुटवडा, प्रभावित झालेली कामे आणि उत्पादनाला कमी मागणी असल्याने, ‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी गत २३ मार्चपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या उद्योग आणि व्यवसायांत काम करणारे जिल्ह्याबाहेरील आणि परप्रांतातील ४ हजार ८४९ पेक्षा अधिक मजूर-कामगार आपआपल्या गावांकडे गेले होते. त्यापैकी ७० टक्के मजूर-कामगार अद्यापही जिल्ह्यात परतले नाही. कोरोना संकटाच्या काळाच्या मजूर परत येण्यास तयार नसल्याने, मजूर-कामगारांच्या तुटवड्याचा उद्योग-व्यवसायांच्या कामांवर परिणाम झाला आहे. तसेच उद्योगांमध्ये निर्मिती होणाऱ्या विविध उत्पादनाला कमी मागणी असल्याने उद्योगांची उलाढाल प्रभावित झाली आहे. बांधकाम व्यवसायात इमारतींची बांधकामे काही प्रमाणात सुरू झाली असली तरी, या व्यवसायांतर्गत येणारी विविध कामे अद्यापही ठप्पच आहेत. त्यामुळे ‘अनलॉक’मध्येही जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांची गती मंदावलेलीच असल्याने या क्षेत्रातील अवकळा कायम असल्याचे वास्तव आहे.
‘या’ उद्योग-व्यवसायावर झाला परिणाम!
कोरोना संकट काळात जिल्ह्यात दालमिल, मिनी दालमिल, व्हाइट कोल निर्मिती, आॅइल मिल, फेब्रिकेशन, सिमेंट, टाइल्स, कृषी अवजारे, टॅÑक्टर-ट्रॉली, थे्रशर, प्लास्टिक पॅकिंग, प्लास्टिक कॅन आदी उद्योगांसह बांधकाम व्यवसायातील इमारतींची बांधकामे, बोअरिंग, सेंट्रिंग, पेंटर, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, पीओपी, सुतारकाम आदी व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यातून असे परतले परप्रांतीय मजूर!
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जिल्ह्यातून ४ हजार ८४९ परप्रांतीय मजूर-कामगार आपआपल्या गावाकडे परतले. त्यामध्ये आंध्र प्रदेश-१०२, बिहार-७७१, छत्तीसगड-६८, गुजरात-४३, झारखंड-३११, कर्नाटक-८, केरळ -९, मध्य प्रदेश -११२६, नवी दिल्ली-५,ओरिसा-५७, पंजाब-८, राजस्थान -४१९, तामिळनाडू -२०, तेलंगणा -१३२, उत्तर प्रदेश -१२५०, उत्तराखंड -१६ व पश्चिम बंगालमधील ४८४ इत्यादी मजूर-कामगारांचा समावेश.