यंदाही शेतकऱ्यांना चिखल तुडवित जावे लागते शेतात; शेतमालाच्या वाहतुकीचीही चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:46+5:302021-07-19T04:13:46+5:30
संतोष येलकर अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन ...
संतोष येलकर
अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चिखल तुडवित शेतात जावे लागत असून, शेतात तयार होणाऱ्या शेतमालाची वाहतूक चिखलमय रस्त्यातून करणार तरी कशी, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यानुषंगाने पाणंद रस्त्यांची कामे होणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. प्रस्तावित पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ कोटी ४३ लाख ६३ हजार रुपयांचा निधी १८ मार्चपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु पाणंद रस्त्यांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिखल तुडवित शेतात जावे लागत आहे. पावसाळ्यात शेतरस्ते चिखलमय होत असल्याने, शेतात जाणे येणे करण्यासाठी चिखलमय रस्त्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. रस्त्यांअभावी शेती कामांसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर चिखलातून शेतात नेणार कशी, याबाबतच्या समस्येचा शेतकऱ्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच शेतात तयार होणाऱ्या शेतमालाची चिखलमय रस्त्यातून वाहतूक करणार तरी कशी, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पार्श्वभूमीवर शेतात जाणे येणे करण्यासाठी पाणंद रस्त्यांची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केव्हा थांबणार शेतकऱ्यांचे हाल?
शेतरस्त्यांची कामे करण्यात आली नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाणे येणे करावे लागते. चिखलातून शेतात वाहन नेणे शक्य होत नसल्याने, शेतात तयार झालेला शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतात तयार झालेल्या शेतमालाचे गाठोडे बांधून शेतकरी व शेतमजुरांना डोक्यावर ने-आण करावी लागते. त्यामुळे चिखल तुडवित शेतातून शेतमाल घरी आणताना शेतकऱ्यांना सोसावे लागणारे हाल थांबणार तरी केव्हा, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.
पाणंद रस्त्यांची अशी
आहेत प्रस्तावित कामे!
उपविभाग रस्ते
अकोट ६६
अकोला ०७
बाळापूर १७
मूर्तिजापूर ०९
................................................
एकूण ९९
गावात शेतरस्त्याचे काम करण्यात आले नसल्याने शेतरस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे चिखल तुडवित शेतात जाणे येणे करावे लागते. चिखलमय रस्त्यातून शेतात तयार झालेला शेतमाल घरी आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चिखलमय रस्त्यातून शेतमालाची वाहतूक करता येत नसल्याने अनेकदा तयार झालेल्या शेतमालावर ताडपत्री टाकून शेतातच ठेवावा लागतो.
- शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव
जिल्ह्यात ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पाणंद रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला