अखेर खासगी रुग्णालये सुरू!

By admin | Published: March 25, 2017 01:34 AM2017-03-25T01:34:50+5:302017-03-25T01:34:50+5:30

आयएमएचा संप मागे; सायंकाळपासून उघडली रुग्णालये, मार्डचा संप कायम

Eventually private hospitals started! | अखेर खासगी रुग्णालये सुरू!

अखेर खासगी रुग्णालये सुरू!

Next

अकोला, दि. २४- डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ मार्ड आणि आयएमएच्या डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपामुळे दोन दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होत होती. शेकडो रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागले होते; परंतु आयएमएने रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आणि शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतापासून रुग्णालये सुरू केली, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून मारहाण केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे शासनाने डॉक्टरांना कायमस्वरूपी सशस्त्र पोलिसांचे संरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांना घेऊन आणि डॉक्टरांवरील मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मार्ड, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शहरातील रुग्णालये दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले. आयएमएच्या निर्णयाचा ग्रामीण भागासह शहरी भागातील रुग्णांना चांगलाच फटका सहन करावा लागला. रुग्णालयात उपचार व औषधोपचार घेण्यासाठी आलेल्यांना उपचाराविनाच परतावे लागले; परंतु अत्यवस्थ रुग्णांना मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात प्रवेश देत त्यांच्यावर उपचार केले.
शुक्रवारी सायंकाळी राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर अकोला आयएमएमनेसुद्धा आपला संप मागे घेतला आणि सर्व डॉक्टरांना रुग्णालये उघडून रुग्णसेवा करण्यास सांगितले.
त्यामुळे शहरातील डॉक्टरांनी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रुग्णालये पूर्ववत सुरू करून रुग्णांवर उपचार केले. रुग्णांची गैरसोय आता टळली आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला सर्वोपचारचा आढावा
खासगी डॉक्टर, मार्डच्या संपाचा सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला का, याचा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. ना. महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह सहकारी डॉक्टरांसोबतच चर्चा केली. डॉ. घोरपडे यांनी मार्डचे १६ डॉक्टर आणि ९0 आंतरवासिता डॉक्टर रजेवर गेले आहेत; परंतु त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही. पुरेशे मनुष्यबळ असल्याने रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी ना. महाजन यांना दिली.

Web Title: Eventually private hospitals started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.