रेड झोन परिसरातून अकोटात येतात दररोज १०० वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:19 AM2020-05-19T10:19:57+5:302020-05-19T10:22:12+5:30
अकोला रेड झोन एरियातून दररोज १०० वाहने अप-डाउनकरिता वापरल्या जात आहेत.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शासनाने अधिकृतरीत्या मान्यता न दिलेल्या अनेक वाहनांवर आॅन ड्युटी बोर्ड लावून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. अकोला रेड झोन एरियातून दररोज १०० वाहने अप-डाउनकरिता वापरल्या जात आहेत. त्यामुळे अकोट शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोना संकटामुळे प्रशासनाने लॉकडाउन व संचारबंदीमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना अधिकृतरीत्या परवाना दिला आहे; परंतु अकोट शहरात व तालुक्यात शेकडो चारचाकी व दुचाकी वाहनांवर आॅन ड्युटी असे बोर्ड लावलेले आहेत. संगणकामधून आॅनड्युटी प्रिंट काढलेले कागद वाहनांवर चिटकवून जणुकाही शासकीय सेवेतच असल्याचा भास निर्माण करत अनेक रिकामटेकडे सर्रास वाहने फिरवत आहेत. अनेक जण अकोलासह इतर गावांनासुद्धा जाणे-येणे करत आहेत. अकोट शहरात दररोज बँक, शासकीय, अशासकीय कार्यालय, संस्था व इतर ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी हे प्रशासनाचा कुठलाही परवाना नसताना आॅनड्युटी बोर्ड लावून सर्रास अप-डाउन करत आहेत. थेट अकोला महानगर या रेड झोन क्षेत्रातून आॅनड्युटी अप-डाउन सुरू असल्याने अकोट शहरातील सुरक्षा व्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय आहे. तरी सुध्दा अनेक जण रेड झोन एरियातून अप-डाउन करीत आहेत. शिवाय बँक व इतर संस्थेतील अधिकारी, कर्मचारीसुद्धा शासकीय सेवेत असल्याच्या तोºयात बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. प्रशासनाने चेक पोस्ट लावले आहेत. २४ तास नाकेबंदी केली आहे, तरीसुद्धा कोणताही अधिकृत शासकीय परवाना नसताना आॅनड्युटी बोर्ड लावलेले वाहने अकोट शहरात सोडल्या जात आहेत.
अनेक कुटुंब अकोट शहरात वास्तव्याला
अकोलासह रेड झोन एरियातील अनेक कुटुंब सुरक्षित अकोट शहरात आश्रय घेत आहेत. अनेकांनी सर्व साहित्यासह अकोट शहर व तालुका गाठला आहे. घरगुती साहित्याने भरलेली अनेक वाहने आॅन ड्युटी, अत्यावश्यक सेवा अशा बोर्ड लावलेल्या वाहनातून होत आहे काय, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अनेक जण आॅन ड्युटी बोर्ड लावलेल्या वाहनातून दाखल होत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी झाली काय, याबाबतची चौकशी करत चेकपोस्टवरच त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी करणे आवश्यक आहे.