गावातील प्रत्येक व्यक्ती विकसित, तरच गाव आदर्श
By admin | Published: November 22, 2014 02:13 AM2014-11-22T02:13:09+5:302014-11-22T02:13:09+5:30
ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण; संजय धोत्रेंनी केला केळीवेळीच्या विकासाचा संकल्प!
विवेक चांदूरकर / केशव सांगूनवेढे
केळीवेळी : गावातील रस्ते, नाल्या या भौतिक सुविधांसोबतच जर गावातील प्रत्येक माणूस, युवक व महिलांचा विकास झाला तरच खर्या अर्थाने गावाचा विकास झाला, असे म्हणता येईल. विचारात बदल झाला तरच माणूस बदलतो आणि मग त्यातून झालेली गावाची सुधारणा ही चिरकाल टिकून राहते. त्यामुळे गावातील लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे हाच गाव आदर्श झाल्याचा पुरावा आहे, असे मत खासदार संजय धोत्रे यांनी मांडले. सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये केळीवेळी गावाची निवड झाल्यानंतर पहिलीच ग्रामसभा २१ नोव्हेंबर रोजी गावात पार पडली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. रामसिंग राजपूत यांनी प्रास्ताविकातून केळीवेळी गावाचा इतिहास व स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. खा. धोत्रे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, केळीवेळी गावाची निवड ही विचारपूर्वक करण्यात आली. या गावातील लोकांमध्ये सत्कार्य करण्याची उर्मी आहे. विकास करण्याची जिद्द आहे. सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात. या गावातील अनेक लोकांना पाहिले, त्यांनी दिलेला लढा पाहिला. त्यांनी कधीच हार मानली नाही. आता गावकर्यांची जबाबदारी अधिकच वाढली. घाणच केली नाही तर साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपल्याला या गावाचा असा विकास करायचा आहे की, केळीवेळीचे नाव संपूर्ण देशात जाईल व संपूर्ण देशातील लोक केळीवेळीला बघायला येतील, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.