भरदिवसा दीड लाखांची रोकड पळविली
By admin | Published: January 8, 2016 02:14 AM2016-01-08T02:14:49+5:302016-01-08T02:14:49+5:30
मुख्य बाजारपेठेतील गांधी रोडवरील घटना.
अकोला - मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोरून अज्ञात चोरट्याने एका इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीमधील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना बुधवारी भरदिवसा घडली. त्यांच्याच खिशातील रस्त्यावर पडलेल्या ४0 रुपयांसाठी स्वत:कडील दीड लाख रुपयांची रक्कम सेवानवृत्त शिक्षकाने गमावल्याची माहिती आहे. मलकापूर परिसरातील रहिवासी तथा सेवानवृत्त शिक्षक रमेश गोटीराम राऊत (६0) यांनी गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेतून बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर सदरची रक्कम एका बॅगमध्ये ठेवून ते बँक इमारतीच्या खाली आले व त्यांच्या एमएच ३0 एएल ५0४९ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये रक्कम ठेवली. एवढय़ातच त्यांची नजर चुकवून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डिक्कीतील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम अलगद पळविली. राऊत यांच्या काही लक्षात येण्याच्या आतच चोरट्याने त्यांची रक्कम पळविल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाची तक्रार दिली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.