भरदिवसा दीड लाखांची रोकड पळविली
By admin | Published: January 8, 2016 02:19 AM2016-01-08T02:19:37+5:302016-01-08T02:19:37+5:30
४0 रुपयांसाठी गेले दीड लाख
अकोला - शहरासह जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोरून अज्ञात चोराने एका इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीमधील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना बुधवारी भरदिवसा घडली. त्यांच्याच खिशातील रस्त्यावर पडलेल्या ४0 रुपयांसाठी स्वत:कडील दीड लाख रुपयांची रक्कम या सेवानवृत्त शिक्षकाने गमावल्याची माहिती आहे.
मलकापूर परिसरातील रहिवासी तथा सेवानवृत्त शिक्षक रमेश गोटीराम राऊत (६0) यांनी गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेतून बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी एमएच ३0 एएल ५0४९ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये रक्कम ठेवली. एवढय़ात त्यांची नजर चुकवून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरांनी डिक्कीतील रक्कम अलगद पळविली. राऊत यांच्या काही लक्षात येण्याच्या आतच चोरट्याने रक्कम पळविल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश राऊत यांनी दीड लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या एका इसमाने त्यांना तुमच्या खिशातील ४0 रुपये पडल्याचे सांगितले. राऊत यांनी या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ४0 रुपये बघण्यासाठी रस्त्यावर जाताच, अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीमधील दीड लाख रुपयांची रोकड अलगद लंपास केली.