एमपीएससी परीक्षेसाठी प्रत्येकाला हवी समान संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:49 AM2021-01-02T11:49:15+5:302021-01-02T11:52:19+5:30
MPSC exam News विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध करत प्रत्येक घटकाला समान संधी द्यावी, असे मत व्यक्त केले.
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे; मात्र आयोगाने प्रत्येकाला समान संधी द्यावी, असे मत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. आयोगाच्या या निर्णयाचे काही विद्यार्थ्यांकडून स्वागत, तर काही विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. उमेदवारांना आता सहा संधी मिळणार असून, मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातींपासून हा निर्णय लागू होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध करत प्रत्येक घटकाला समान संधी द्यावी, असे मत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांच्या मते वाढत्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. विविध घटकातील विद्यार्थी एकाच ठिकाणी अभ्यास करतात. त्यातील एकाला केवळ सहा, तर दुसऱ्याला नऊ संधी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते. प्रत्येकाला समान संधी असावी.
- ललीत नगराळे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर हा निर्णय आहे. वाढती स्पर्धा पाहता अशी बंधने असणे आवश्यक आहे. राज्य घटनेनुसार, मागासवर्गीय घटकांना दिलेल्या वाढीव संधीदेखील योग्य आहेत. या निर्णयाचे स्वागतच. - विशाल मुळे, स्पर्धा परीक्षा उमेदवार.
काही अंशी निर्णय योग्य वाटत असला, तरी सर्वच घटकांना समान संधी देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थी असो, तो इतरांप्रमाणेच अभ्यास करतो. त्यामुळे सर्वांसाठी समान संधी देणे आवश्यक आहे.
- सचिन मुंडे, स्पर्धा परीक्षा उमेदवार.
यूपीएससी परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांना संधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेची गुणवत्ता वाढेल. निर्णय योग्य आहे; पण सर्वांना समान संधी हवी, असे मला वाटते.
- विशाल चिकटे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
अशा प्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.