एमपीएससी परीक्षेसाठी प्रत्येकाला हवी समान संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:16 AM2021-01-02T04:16:08+5:302021-01-02T04:16:08+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. विविध घटकातील विद्यार्थी एकाच ठिकाणी अभ्यास करतात. त्यातील एकाला केवळ सहा, तर दुसऱ्याला ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. विविध घटकातील विद्यार्थी एकाच ठिकाणी अभ्यास करतात. त्यातील एकाला केवळ सहा, तर दुसऱ्याला नऊ संधी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते. प्रत्येकाला समान संधी असावी.
- ललीत नगराळे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर हा निर्णय आहे. वाढती स्पर्धा पाहता अशी बंधने असणे आवश्यक आहे. राज्य घटनेनुसार, मागासवर्गीय घटकांना दिलेल्या वाढीव संधीदेखील योग्य आहेत. या निर्णयाचे स्वागतच. - विशाल मुळे, स्पर्धा परीक्षा उमेदवार.
काही अंशी निर्णय योग्य वाटत असला, तरी सर्वच घटकांना समान संधी देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थी असो, तो इतरांप्रमाणेच अभ्यास करतो. त्यामुळे सर्वांसाठी समान संधी देणे आवश्यक आहे.
- सचिन मुंडे, स्पर्धा परीक्षा उमेदवार.
यूपीएससी परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांना संधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेची गुणवत्ता वाढेल. निर्णय योग्य आहे; पण सर्वांना समान संधी हवी, असे मला वाटते.
- विशाल चिकटे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
अशा प्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.