कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:19 PM2019-04-18T12:19:17+5:302019-04-18T15:57:48+5:30
कवठा (अकोला) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली.
विलास बोरचाटे
कवठा (अकोला) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली. मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्याने इव्हीएम फोडले. कवठा-बहादूरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या इसमाने गोंधळ घातला. ईव्हीएम मशिनवर आपला विश्वास नसल्याचे सांगत त्याने बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या घ्यारे याने मतदान यंत्र जमीनीवर आदळले. यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. निवडणुक अधिकाऱ्यांनी दुसरे मतदान यंत्र बोलावल्यानंतर एका तासाने मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. दरम्यान, श्रीकृष्ण घ्यारे याला उरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.