‘ईव्हीएम’ घोळ ?
By admin | Published: February 24, 2017 02:50 AM2017-02-24T02:50:45+5:302017-02-24T02:50:45+5:30
नेत्यांचा आरोप; उमेदवारांनी केल्या तक्रारी
अकोला, दि. २३-इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)मध्ये घोळ असल्याच्या तक्रारी मतमोजणी झाल्यानंतर गुरुवारी रात्री काही उमेदवारांनी पोलिसांकडे केल्या. निवडणूक आयोगाविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याने पोलिसांनी या तक्रारी स्वीकारण्यास नकार दिला. ईव्हीएममधील घोळाच्या तक्रारी शुक्रवारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून तब्बल ४८ जागांवर त्यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजपाचे बहुतांश उमेदवार हे ईव्हीएममधील घोळामुळे विजयी झाल्याचा आरोप भाजपा वगळता सर्वपक्षाचे नेते व उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा संशय आल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास प्रारंभ केला; मात्र पोलिसांनी सदर प्रकरण त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उमेदवारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे.
मनसेच्या उमेदवारास शून्य मतदान
प्रभाग १३ मध्ये मनसेचे उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी मतमोजणी झाली असता यामध्ये सदर उमेदवारास एकही मत मिळाले नाही. सदर उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांनी मनसेलाच मतदान केल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र त्यानंतरही त्यांना एकही मत न मिळाल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक सेटिंग केल्याचा आरोप केला आहे.
प्रभाग १३ मध्ये सेटिंगचा आरोप
प्रभाग १३ मधील सेनेचे उमेदवार नंदू ढोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मतदान ज्या बुथमध्ये होते. त्या बुथवरून ढोरे यांना केवळ एक मत मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचेही मतदान त्यांना मिळाले नसल्याने त्यांनी सदर बुथवरील ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप केला आहे.