माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांची पतसंस्था शासनाने केली दिवाळखोर घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:49 PM2019-01-15T12:49:59+5:302019-01-15T12:50:42+5:30
बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे.
बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे. पतसंस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी व ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी संचालकांवर निश्चित करण्यासाठी शासनाने प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे बाळापूर तालुक्यात व विशेषत: राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.सहकारी संस्था, बाळापूरचे सहायक निबंधक ए. बी. नादरे यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेस दिवाळखोर घोषित करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष अॅड. खतीब व व्यवस्थापक यांना पाठविलेल्या पत्रात संस्था दिवाळखोर घोषित करण्यामागील कारणेही नमूद केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थेविरुद्ध संस्था ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळत नसल्याबद्दल केलेल्या तक्रारी, ठेवी परत मिळविण्यासाठी ठेवीदारांनी केलेले उपोषण व काही ठेवीदारांनी संस्था संचालक व कर्मचारी यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर झालेले गुन्हे दाखल, संस्थेची कर्जवसुली अल्प प्रमाणात होत असून, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास संस्था असमर्थ असल्याचे निदर्शनास आलेले आहे व संस्थेचे कामकाज बंद असून, पतसंस्थेचे कार्यालयही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) क (दोन) (चार) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, बाळापूर यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेस दिवाळखोर घोषित केले असून, संस्थेचे व्यवहार गुंडाळण्यासाठी सहकारी संस्थेचे माजी सहायक निबंधक एस. डब्ल्यू. डोंगरे यांची पतसंस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे.
अॅड. खतीब यांच्यासह १३ संचालकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.