परीक्षा शुल्क माफीचा लाभ १४ हजारपेक्षा जास्त गावातील विद्यार्थ्यांना!
By admin | Published: November 28, 2015 02:31 AM2015-11-28T02:31:22+5:302015-11-28T02:31:22+5:30
१४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार.
कारंजा (वाशिम): यंदा ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार असून, यासंदर्भातील निर्णय २४ नोव्हेंबर रोजीच घेण्यात आला. खरीप व रब्बी हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना जाहीर करण्यात येतात. त्यानुसार २0१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेल्या १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कृषीपंपाच्या चालू वीज देयकांत ३३.५ टक्के सूट, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना परिक्षा शुल्क माफी, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदि सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑक्टोबर २0१५ रोजी घेतला होता. आता १४ हजार ७0८ गावांतील विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २४ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी तात्काळ कारवाई करून, आवश्यक असल्यास निधीची तरतूद करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.